Crime News : सगळीकडे आज मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात असताना दिल्लीतील एका कुटुंबावर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण घराच्या बाहेर रस्त्यावर खेळत असलेल्या त्यांच्या दोन वर्षीय मुलीचा कारने चिरडल्याने मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेली ही ह्युंदाई व्हेन्यू कार एक १५ वर्षी मुलगा चालवत होता.

रविवारी ही मुलगी पहाडगंज येथील तिच्या घराच्या बाहेर रस्त्यावर खेळत होती त्यावेळी हा अपघात झाला. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. ज्यामध्ये ही कार अत्यंत कमी वेगात येताना दिसत आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हर या मुलीपासून सुमारे एक मीटर अंतरावर गाडी थांबवल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण गाडी पुन्हा चालू लागली आणि ड्रायव्हरला रस्त्यावर खेळत असलेली मुलगी दिसलीच नाही. गाडी पुढं आली आणि तिच्या पुढच्या चाकाखाली मुलगी चिरडली गेली. आजूबाजूला असलेले लोक तात्काळ त्या मुलीकडे धावले आणि गाडी मागे घेऊन मुलीला चाकाखालून काढण्यात आले. नंतर लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयातही दाखल केले मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, ही गाडी पीडित मुलीच्या कुटुंबाच्या एका शेजाऱ्याची होती आणि अपघातावेळी त्यांचा मुलगा ही गाडी चालवत होता. तसेच या प्रकरणी बेदरकारपणे गाडी चालवणे आणि निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या मुलाचे वडील पंकज अग्रवाल यांना ताब्यात घेतले आहे.

या अपघातामुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी पुणे शहरात एका किशोरवयीन मुलाने पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त झाला होता.