15-year-old student in Kerala died by suicide Crime News: केरळमध्ये शाळेतील रॅगिंग आणि छळाला कंटाळून एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने १५ जानेवारी रोजी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोची येथील एका प्रसिद्ध खाजगी शाळेत हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. शाळेत सतत त्याचा रॅगिंग आणि छळ केला जात असे. अखेर याला कंटाळून शाळेतून परत आल्यानंतर या विद्यार्थ्याने स्वत:चे जीवन संपवले. दरम्यान या विद्यार्थ्याच्या आईने मुलाला शाळेत टॉयलेट चाटण्यास भाग पाडण्यात आल्याचा तसेच टॉयलेट फ्लश होत असताना त्याचे डोके टॉयलेटमध्ये कोंबण्यात आल्याचा दावा केला आहे.

आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईने थ्रिपूनीथूरा (Thripunithura) येथील हिल पॅलेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. चाइल्ड कमिशनकडे देखील याचिका दाखल केली असून ज्यामध्ये त्यांनी मुलाच्या छळाची कसून चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीत त्या मुलाच्या यापूर्वीच्या शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी व्यवस्थित वागणूक न दिल्याचा आरोपही त्याच्या आईने केला आहे.

आईची फेसबुक पोस्ट….

आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपले दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले की, “मी माझ्या मुलाच्या न्यायासाठी लढणारी एक दु:खी आई आहे, जो आनंदी, सक्रिय आणि एक प्रेमळ मुलगा होता. त्या दिवशी, माझा मुलगा दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी शाळेतून घरी परतला आणि दुपारी ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत माझे जग उद्ध्वस्त झाले…”.

दरम्यान मुलाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे समजून घेण्यासाठी त्याची आई आणि कुटुंबियांनी त्याच्या मित्रांशी चर्चा केली तसेच त्याचे सोशल मीडिया अकाउंट देखील तपासले. यामधून त्याचा शाळेत करण्यात आलेल्या छळाचा प्रकार समोर आला. आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईने दावा केला की त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली, तसेच त्याच्या त्वचेच्या रंगामुळे त्याचा वारंवार अपमान करण्यात आला, त्याला शिवीगाळ करण्यात आली, इतकेच नाही तर त्याला बळजबरीने वॉशरूममध्ये नेण्यात आले आणि टॉयलेट चाटण्यास भाग पाडण्यात आले, फ्लश होत असताना त्याचे डोके टॉयलेटमध्ये कोंबण्यात आले.

मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने काही धक्कादायक चॅटचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये काही विद्यार्थी त्या मुलाच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करताना असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या काही मित्रांनी त्याला न्याय मिळावा यासाठी इंस्टाग्रामवर एक पेज सुरू केले, पण शाळेकडून दबाव टाकण्यात आल्यानंतर ते पेज काढून टाकण्यात आले. मुलाच्या आईने दावा केला आहे की शाळा प्रशासनाने सत्य दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आणि फक्त पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

“त्याच्या मृत्यूनंतरही त्यांचे क्रौर्य थांबले नाही, मी जेव्हा शाळा प्रशासनाकडे पुरावे घेऊन गेले आणि त्यांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी मला फक्त माहिती पोलीसांकडे पाठवण्यात आल्याचं ऐकवलं. मला ठाम विश्वास आहे की, शाळेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी हे प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असेही मुलाच्या आईने म्हटले आहे.

दुसऱ्या मुलाला त्रास होणार नाही याची….

आपल्या पोस्टमध्ये या मुलाच्या आईने न्यायाची मागणी केली आहे. “मी माझ्या मुलासाठी न्यायाची भीक मागते. त्याचा मृत्यू वाया जाता कामा नये. या रानटी कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शासन व्हावे आणि व्यवस्थात्मक बदल झाले पाहिजेत. माझ्या मुलाप्रमाणे दुसऱ्या मुलाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.” त्यांनी यावेळी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत लोकांच्या पाठिंब्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, “मी लोकांकडे न्यायासाठीच्या या लढाईला पाठिंबा देण्याचे आवाहन करते. फक्त माझ्या मुलासाठीच नाही, तर शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळावे असं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी.”

Story img Loader