Crime News : अमेरिकेतून आपल्या कुटुंबाला घेऊन पाकिस्तानात परतलेल्या एका व्यक्तीने एक भयंकर गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनेकदा सांगूनही आपली १५ वर्षीय मुलगी सतत टिकटॉकवर व्हिडीओ पोस्ट करत असल्याच्या रागातून तिची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेची नागरिक असलेली ही मुलगी १५ जानेवारी रोजी तिच्या कुटुंबासह पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे आली होती. त्यानंतर मंगळवारी तिचे वडील आणि काकांनी गोळ्या झाडून तिची हत्या केली. यानंतर दोन्ही आरोपींना न्यायाधिशांनी १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी आबाद बलोच यांनी सांगितले की, नेमकं काय झालं हे समजून घेण्यासाठी सध्या मुलीच्या लहान भावाची देखील चौकशी केली जात आहे. दरम्यान मुलीचे वडिल आणि काकांनी हवेत गोळीबाराच्या घटने दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.

हत्या करण्यासाठीच पाकिस्तानात घेऊन आले?

“अमेरिकेतील कठोर कायद्यांमुळे वडील मुलीला ठार मारण्याच्या उद्देशानेच पाकिस्तानात घेऊन आले होते की नाही याचा आम्ही तपास करत आहोत,” असेही बलोच यांनी सांगितेल. मिळालेल्या माहितीनुसार २८ वर्षांपूर्वी हे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले होते.

दरम्यान परदेशात जन्मलेली आणि वाढलेली पाकिस्तानी मुलगी देशात किंवा परदेशात असताना ‘ऑनर किलिंग’च्या घटनेला बळी पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

विशेषतः महिलांची त्यांच्यात कुटुंबातील सदस्यांकडून हत्या होण्याच्या घटना पाकिस्तानात सतत समोर येतात. येथील मोठ्या शहरात देखील हे प्रकार नेहमी उजेडात येतात. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका व्यक्तीने कराची येथे त्याची आई, बहीण, वहिनी आणि भाची यांची हत्या केली होती.याचे कारणही त्यांनी टिकटॉक व्हिडिओ बनवणे थांबवण्यासा नकार दिला होता. त्याने राहत्या घरात त्यांचे गळे चिरले होते. या व्यक्तीला नंतर अटक करण्यात आली.

अशाच एका दुसऱ्या प्रकरणात एका व्यक्तीने त्याच्या आई-वडीलांच्या समोर पत्नीचा गळा आवळून खून केला होता, यावेळी त्याचा मित्र या हत्येचा व्हिडीओ रोकॉर्ड करत होता. हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना पंजाब येथून अटक करण्यात आली.

कौटुंबाच्या खोट्या सन्मानाच्या विचाराने ऑनर किलिंगचे प्रकार घडतात, कुटुंबातील सदस्यांच्या परवानगीशिवाय लग्न करणारी जोडपी देखील याला बळी पडतात.

२०२४ मध्ये पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगमध्ये किमान ३४६ महिला आणि १८५ पुरुषांनी आपला जीव गमावला आहे. २०२३ मध्ये ही आकडेवारी ३१४ महिला आणि १७६ पुरुष इतकी होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 years old us teen murdered by father in pakistan for posting tiktok videos marathi crime news rak