पीटीआय, श्रीनगर : अमरनाथ गुंफेजवळ शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरूंची संख्या शनिवारी १६ वर पोहोचली. येथे अजूनही काही जण चिखलगाळाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. येथे शोधकार्य अखंडपणे सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की येथे अडकलेल्या १५ हजार यात्रेकरूंची सुरक्षितरीत्या  सुटका करून त्यांना पायथ्याच्या पंचतरिणी येथील शिबिरात पाठवण्यात आले आहे. २५ जखमींना रुग्णालयात हलवले आहे.

शुक्रवारी येथे पावसाने अचानक आलेल्या पुराने तसेच दरडी कोसळल्याने तंबू आणि तात्पुरत्या उभारलेल्या स्वयंपाक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले, की डोंगराळ भागात काम करणारे मदत पथक आणि शोध पथके अद्ययावत उपकरणे व श्वान पथकांसह घटनास्थळ परिसरात शोधकार्य करत आहेत. शनिवारी सकाळी हवाई मार्गे लष्करी हेलिकॉप्टरने सहा यात्रेकरूंची सुटका करण्यात आली. निलाग्रार हेलिपॅड येथे लष्कराचे वैद्यकीय पथक जखमींवर उपचार करत आहे. मृतदेहांना नेण्यासाठी येथील पथक मदत करत आहे. सीमा सुरक्षा दलाच्या हवाई विभागाचे ‘एमआय-१७ ’ हेलिकॉप्टर  तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनातर्फे बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर कार्यरत आहेत.

सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिल्लीत सांगितले, की आतापर्यंत सोळा मृतदेह बलताल येथे हलवण्यात आले आहेत. भारत-तिबेट सीमा पोलीस दलाने रस्ता खुला करणारी व त्यांची सुरक्षा करणारी पथके अमरनाथच्या पवित्र गुंफेपासून पंचतारिणीपर्यंत तैनात केली आहेत. जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी शनिवारी सकाळी अमरनाथ   गुहा परिसरास भेटून  मदतकार्याची पाहणी केली. त्यांनी सांगितले, की येथील ढिगारे हटवण्याचे काम पथके करत आहेत. प्रशासनातर्फे यात्रेकरूंची माहिती तपासली जात आहे. मृतांची नेमकी संख्याही त्याद्वारे समजेल. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यामुळे प्रत्येक यात्रेकरूला ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड’ दिलेले आहे. त्याद्वारेही या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

 ३० जूनला ही वार्षिक अमरनाथ यात्रा सुरू झाली. या दुर्घटनेमुळे ती स्थगित करण्यात आली आहे. मदतकार्य संपल्यानंतरच ही यात्रा पुढे सुरू करण्याचा निर्णय होईल, असे ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले.  दरम्यान, हवामान विभागाने सांगितले की, ही दुर्घटना ढगफुटीमुळे झाली नसून, स्थानिक पातळीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे झाली. या परिसरात शुक्रवारी दुपारी साडेचार ते साडेसहापर्यंत ३१ मिलिमीटर पाऊस पडला, जो ढगफुटीसारख्या घटनेच्यादृष्टीने कमी आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले, की अमरनाथ गुहेजवळील पर्वतांच्या उंच शिखरांवर पावसामुळे अचानक पूर आला असावा. तासाभरात १०० मिलिमीटर पाऊस पडल्यास त्याला ‘ढगफुटी’  म्हणून हवामान विभागातर्फे गणले जाते.

यात्रेकरूंची अकरावी तुकडी रवाना

या दुर्घटनेनंतरही सहा हजारहून अधिक अमरनाथ यात्रेकरूंच्या अकराव्या तुकडीने शनिवारी जम्मू शहरातून काश्मीरमधील दुहेरी पायथा शिबिरासाठी प्रस्थान ठेवले. ही यात्रा तब्बल तीन वर्षांनंतर होत आहे. २०१९ मध्ये,केंद्राने काश्मीरसाठीचे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्यापूर्वी ही तीर्थयात्रा मध्येच रद्द करण्यात आली. कोविड महासाथीमुळे २०२० आणि २०२१ मध्ये ही तीर्थयात्रा झाली नव्हती.

Story img Loader