भारत-चीन सीमेवरून भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनच्या किमान १६ नागरिकांना अटक करण्यात आली असून यापैकी बहुसंख्य नागरिक तिबेटमधील आहेत.  अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे एका पीएलए सैनिकासह चीनच्या चार नागरिकांना अटक करण्यात आली. औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी आम्ही भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेशच्या विविध भागांतून तिबेटच्या सहा नागरिकांना अटक करण्यात आली. आम्ही दलाई लामा यांना भेटण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले, असे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले.
यार्चा गम्बो ही औषधी वनस्पती शोधण्याच्या उद्देशाने भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनच्या आणखी तीन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी सात जणांना तवंग येथे फ्लॅग मिटिंगच्या वेळी चीनच्या अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले तर सहा जणांना सुरक्षा रक्षकांनी पुन्हा चीनमध्ये हाकलून दिले.
दरम्यान, अबरी भाषेतील राजकीय नकाशा बाळगणाऱ्या चीनच्या तीन नागरिकांना लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अटक करण्यात आली.