उत्तर प्रदेशमध्ये थंडीचा कहर सुरूच असून गेल्या चोवीस तासांत १६ जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत थंडीमुळे एकूण २४९ जणांचा बळी गेला आहे. गोरखपूरमध्ये पाचजणांचा बळी गेला असून गुरुवारी येथे राज्यातील निच्चांकी तापमान नोंदवले गेले. राज्यातील काही भागांत साधारण ५ ते १२ अंश तापमान आहे. येत्या २४ तासांत हवामान कोरडे राहणार असून काही भागांत दाट धुक्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
काश्मीरमध्ये
बर्फवृष्टीची शक्यता
सध्या काश्मीरमधील सीमावर्ती भागातील तापमान उणे अंशाखाली गेले असून रात्रीच्या तापमानात सुधारणा होत आहे. परिणामी येत्या रविवारी आणि सोमवारी काही भागांत बर्फवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
काश्मीरमध्ये हाडे गोठतील एवढी थंडी असून अनेक भागांत उणे अंशाखाली तापमान गेले आहे. लडाख या सीमावर्ती भागात रात्रीच्या वेळी याची साक्ष पटते. राज्यातील सर्वात निच्चांकी तापमान लडाखमध्ये उणे १८.२ नोंदवले गेले होते, तर बुधवारी येथील तापमान उणे १५.८ होते. तसेच लेहमध्ये १६.४ अंश तापमान होते. काश्मीर खोऱ्यासह श्रीनगरमधील रात्रीच्या तापमानात सुधारणा होत आहे. परिणामी बुधवारी रात्री येथे हलकी बर्फवृष्टी झाली.
श्रीनगरमधील तापमान उणे ०.३ अंश नोंदवले गेले. उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग, पहेलगाम आणि अमरनाथ यात्रा भागांतील रात्रीच्या तापमानात सुधारणा होत असल्याचे हवामान खात्यातील सूत्राने सांगितले.