पीटीआय, पाटणा : बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. त्यात राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) १६, संयुक्त जनता दलाचे (जदयू) ११ व काँग्रेसच्या दोघांसह एका अपक्षाचा समावेश आहे. एकूण ३१ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राजभवनात आयोजित एका साध्या समारंभात राज्यपाल फागू चौहान यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.

बिहार विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष राजदच्या १६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यात पक्षप्रमुख लालूप्रसाद यादवांचे थोरले पुत्र तेजप्रताप यादव, आलोक मेहता, सुरेंद्रप्रसाद यादव, रामानंद यादव, ललित यादव, कुमार सर्वजित, चंद्रशेखर, समीर कुमार महासेठ, अनिता देवी, सुधाकर सिंह, जितेंद्र कुमार राय, मोहम्मद मन्सुरी, सुरेंद्र राम, कार्तिक सिंह, शाहनवाज आलम आणि शमीम अहमद यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूच्या ११ मंत्र्यांत विजयकुमार चौधरी, बिजेंद्र यादव, अशोक चौधरी, श्रवण कुमार, लेसी सिंह, मदन सहनी, संजय झा, शीलाकुमारी, सुनील कुमार, मोहम्मद जमा खान आणि जयंत राज यांचा समावेश आहे. या शिवाय काँग्रेसच्या आफाक आलम आणि मुरारी गौतम यांचा समावेश आहे. ‘हिंदूस्तानी आवाम मोर्चा’चे आमदार आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन आणि अपक्ष आमदार सुमितकुमार सिंह यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

नव्या मंत्रिमंडळात पाच मुस्लिम असून, मागील सरकारमध्ये ही संख्या दोन होती. राजदने यादव समाजाच्या सात जणांना मंत्रिपदे दिली असून, त्यांत तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.तसेच राजदकडून भूमिहार समाजाचे कार्तिकेय सिंह आणि राजपूत समाजाचे सुधाकर सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले असून, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांपैकी एक दलित व एक मुस्लीम समाजाचे आहेत.

खातेवाटपही जाहीर

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे सामान्य प्रशासन, गृह, मंत्रिमंडळ सचिवालय, देखरेख आणि निवडणूक विभाग ही खाती आहेत. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे आरोग्य, रस्तेनिर्मिती, नगरविकास आणि घरबांधणी, तसेच ग्रामविकास खात्यांची जबाबदारी आहे.

Story img Loader