सांगलीच्या दोन तालुक्यांचा उमेदवारांना धक्का, साताऱ्यातही सावट
दिगंबर शिंदे, सांगली</strong>
दुष्काळाच्या वणव्यामुळे व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीसह जत, आटपाडी तालुक्यातील लोकांनी स्वत:बरोबरच गायीगुरांना जगविण्यासाठी आता गाव सोडला आहे. निवडणुकीचा काळ असल्याने शासकीय पातळीवरून या स्थलांतराची पाहणी करण्यात आली असून केवळ या दोन तालुक्यांतील १६ हजार मतदारांनी स्थलांतर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
ही संख्या केवळ मतदारांची असल्याने त्यांच्यासोबत अन्य लहान मुलांचा विचार केला तर हा आकडा आणखी मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सांगलीतील जत आणि आटपाडी तालुक्याचा भाग हा कायम दुष्काळाच्या छायेखाली असतो. मात्र यंदा पावसाअभावी त्याची तीव्रता भीषण स्वरूपाची आहे. सरकारी पातळीवरून दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र चारा छावण्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. पाऊस-पाण्याअभावी शेती नाही, उदरनिर्वाहाच्या चिंतेने शेतकरी हवालदिल तर दुसरीकडे शेतीच नाही त्यामुळे शेतीवर जगणारे मजूरही रानोमाळ भटकू लागले आहेत.
सगळा शेती व्यवसाय ठप्प झाल्याने गावातील बहुतांश लोकांचे अर्थशास्त्र बिघडले आहे. यामुळे या लोकांवर अवलंबून असलेले गावातील अन्य व्यवसाय आणि व्यावसायिकदेखील अडचणीत आले आहेत. दुसरीकडे दिवाळीपासून गावांभोवतीचे माळही करपून गेल्याने गावातील बहुतांश शेतक ऱ्यांना आता त्यांच्या पशुधनाचीही चिंता लागून राहिली आहे. यासाऱ्यातून पोट भरण्यासाठी रोजगाराच्या शोधात आणि पशुधन वाचवण्यासाठी या भागांतून मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होऊ लागले आहे. सांगलीतील जत, आटपाडी आणि सातारा जिल्ह्य़ातील माण-खटाव या तालुक्यातून हे स्थलांतर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्याचा मतदानावर मोठा परिणाम होण्याच्या भीतीने उमेदवारांनाही ग्रासले आहे.
जत तालुक्यातील पांढरेवाडी, मोटेवाडी, कुलाळवाडी, आसंगी तुर्क, लकडेवाडी, कागनरी, दरीबडची, निगडी बुद्रुक, करेवाडी, कारंडेवाडी, टोणेवाडी, मायथळ, पांडोझरी; तर आटपाडी तालुक्यातील माडगुळकरांच्या बनगरवाडीसह लेंगरेवाडी, मासाळवाडी, विभुतवाडी, झरे, पानकात्रेवाडी, पारेकरवाडी आदी गावांतून हे स्थलांतर मोठय़ा प्रमाणात झाले आहे. यातील अनेकांनी अन्य गावांत जाऊन रोजगार शोधला आहे.
जत, आडपाडी तालुक्यातून मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. गावच्या यात्रेसाठीही गावकरी परततील तेव्हा मतदान करून जाण्याचा सल्ला त्यांच्या नातलगांकडे दिला आहे. त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी ग्रामसेवकांमार्फत संपर्क साधण्याचे प्रयत्न होत आहेत.
– अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा परिषद
रोजगारासाठी वणवण..
० मेंढपाळांनी मेंढरांसह कृष्णा, वारणा नदीकाठ जवळ केले आहेत. या नदीकाठी शेतीत काम करणे काहींनी पसंत केले आहे.
० काही लोक मोठय़ा गावांतील वीट भट्टीवर मजुरी करत आहेत. अनेकजण ऊसतोडणी मजूर म्हणून अन्यत्र गेले आहेत.
० काहींनी छोटय़ा मोठय़ा नोकरीसाठी वाळवा, इस्लामपूर, कराड, उंब्रजपासून विजापूर, बेळगाव आदी शहरांना जवळ केले आहे.