सोळा वर्षांच्या मुलीने आपल्या नवजात अर्भकाला वसतीगृहाच्या शौचालयातील खिडकीतून टाकून दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील निजामाबादमध्येही घटना घडली. संबंधित मुलीने नातेवाईक आणि वसतीगृहातील लोकांपासून गर्भवती असल्याचे लपवून ठेवल्यामुळे तिने नवजात अर्भकाला खिडकीतून फेकून दिले, असे तपासात आढळले. या प्रकरणी मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निजामाबादमधील एका सरकारी शाळेत दहावीत शिकणाऱया एका मुलीचा तिच्या एका नातेवाईकाच्या मुलाबरोबर विवाह ठरविण्यात आला होता. गेल्यावर्षी शाळेच्या सुटीच्या काळात ती संबंधित मुलाच्या घरी गेली असता, तिथे तिचे त्या मुलासोबत शारीरिक संबंध आले. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. ही बाब तिने नातेवाईक आणि शाळेतील शिक्षक व इतरांपासून लपवून ठेवली. आपण आजारी आहोत, असे सांगून ती शाळेत जाण्याचे टाळून वसतीगृहामध्ये थांबून राहायची. वसतीगृहामध्ये मुलींच्या आरोग्याची तपासणी करणाऱया परिचारिकांनाही मुलगी गर्भवती असल्याचे कळले नाही, असे पोलीसांनी सांगितले.
वसतीगृहाच्या खोलीतच तिने मंगळवारी सकाळी अर्भकाला जन्म दिला. यानंतर घाबरून तिने त्याला शौचालयाच्या खिडकीतून फेकून दिले. अर्भकाला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिला सध्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी तिच्या भावी नवऱयाविरुद्धही बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येतो आहे.

Story img Loader