एडनच्या खाडीत व्यापारी जहाजांना लुटण्याचा प्रयत्न करणारे तब्बल १६० सागरी चाचे भारतीय तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. विशेष म्हणजे या सागरी चाच्यांना त्यांचे सरकार परत घेण्यास तयार नसल्याची माहिती भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
समुद्रात लूटमार करणाऱ्या या सागरी चाच्यांना भारतीय नौदलाने अटक केली आहे. हे डाकू ज्या देशाचे नागरिक आहेत, त्या सिचेलिस, केनिया आणि इतर राष्ट्रांनी त्यांच्या तुरुंगात जागा नसल्याचे कारण पुढे करीत या दोषी नागरिकांना परत घेण्यास नकार दिला आहे. आजमितीस सुमारे १६० सागरी चाचे भारतीय तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची माहिती तामिळनाडू आणि पाँडिचेरी विभागाचे मुख्य नौदल अधिकारी कमांडर अमर के महादेवन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भारतीय सागरी हद्दीत व्यापारी जहाजे तसेच प्रवासी जहाजांना सुरक्षा पुरवण्याचे काम भारतीय नौदल करते. २००८ पासून ३०० भारतीय जहाजांसह जगभरातील २ हजार ६०० च्या वर जहाजांना भारतीय नौदलाने संरक्षण पुरवून इच्छित स्थळी पोहोचवले आहे. त्याचप्रमाणे एडनच्या खाडीतून वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांना सशस्र रक्षक तैनात करण्याबाबतही विचार झाल्याचे महादेवन यांनी सांगितले.
दरम्यान, डिसेंबरअखेर जपानच्या नौदलाची दोन जहाजे संयुक्त लष्करी सरावासाठी चेन्नई येथे येणार असल्याचेही महादेवन यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा