पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद्यांची ४२ प्रशिक्षण केंद्रे सक्रिय असून गेल्या तीन वर्षांत जम्मू-काश्मीर राज्यात सुमारे २७० अतिरेक्यांनी घुसखोरी केली आहे, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात ही बाब पुढे आली.
केंद्रीय गृह राज्यमंत्री आर.पी.एन. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१० ते २०१२ या कालावधीत सीमेपलीकडून किमान १००० वेळा घुसखोरीचा प्रयत्न केला गेला. या प्रयत्नांना वेळोवेळी भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये १६० अतिरेकी ठार झाले, ५७० अतिरेकी पुन्हा पाकिस्तानात पळून गेले, तर २७० जणांना सीमेचे उल्लंघन करण्यात यश आले. अतिरेक्यांना सीमेपलीकडून म्हणजे पाकिस्तानकडूनच सर्व प्रकारचे प्रशिक्षण मिळते आणि साधनसामग्रीचाही पुरवठा केला जातो. सध्या पाकिस्तानात तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये असे प्रशिक्षण देणारे ४२ तळ सक्रिय आहेत, असेही गृह राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संसदेवरील हल्ल्याचा प्रमुख आरोपी अफझल गुरू याला फाशी देण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती सरकारने मंगळवारी संसदेत दिली.
सन २०१२ मध्ये जम्मू-काश्मीर राज्यात दहशतवादी आणि सुरक्षा अधिकारी यांच्यात चकमकी उडण्याच्या ५० घटना घडल्या. त्यामध्ये सुरक्षा दलाचे १५ अधिकारी मृत्युमुखी पडले तर ६५जण जखमी झाले.
फुटीरतावाद्यांना हवालामार्फत अर्थपुरवठा
नवी दिल्ली : विविध देशांच्या वकिलाती आणि परराष्ट्रांच्या गुप्तचर खात्यांकडून हवालाद्वारे फुटीरतावादी आणि दहशतवादी यांना अर्थपुरवठा होतो, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री आर.पी.एन. सिंग यांनी लोकसभेस दिली. या अर्थपुरवठय़ामागे भारताच्या शेजारील देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा मोठा हात असून या प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे केला जात आहे, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.

Story img Loader