चीनच्या नैर्ऋत्येकडील भागात असलेल्या सिचुआन प्रांताला शनिवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपात १६१ जण मृत्युमुखी पडले असून  सहा हजार लोक जखमी झाले. सुमारे ७.० रिश्टर स्केल क्षमतेच्या या भूकंपामुळे या प्रांतात मोठय़ा प्रमाणावर हानी झाली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू १३ कि.मी. अंतरावर होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भूकंपात १६१ जण मृत्युमुखीडले असून  सहा हजार जखमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ही संख्या एक हजाराहून अधिक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या पाच वर्षांत सिचुआन प्रांताला बसलेला भूकंपाचा हा दुसरा मोठा धक्का आहे. २००८ मध्ये रिश्टर स्केलवर ८.० क्षमतेच्या भूकंपाच्या बसलेल्या धक्क्यामुळे ९० हजारांहून अधिकजण ठार झाले होते. सदर प्रांत हा भूकंपप्रवण क्षेत्रातील आहे. सिचुआन हे तिबेटच्या जवळ आहे.
भूकंपामुळे इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे टेलिव्हिजनच्या दृश्यांमधून दिसून आले. भूकंपामुळे चेंगडू येथील विमानतळाचे नुकसान झाल्याने तो बंद ठेवण्यात आला आहे. चीनचे अध्यक्ष झी जीनपिंग यांनी मदतकार्य पथकाला शर्थीचे प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.
संपर्क तुटला
या भूकंपात गुचेंग या गावातील जवळपास सर्व घरे कोसळली तर तैपिंग, बोशेंग आणि दाचुआन या गावांचा चीनशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.