पुढील वर्षी म्हणजेच मार्च, २०१५पर्यंत भारतात मोबाइल इंटरनेट उपयोगकर्त्यांची संख्या १६५ दशलक्षांपर्यंत जाईल, असा अंदाज इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (‘आयएएमएआय’) व ‘आयएमआरबी’ने व्यक्त केला आहे. मोबाइल डिव्हाइसेस आणि डोंगल्सद्वारा इंटरनेट जोडणी करून घेणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. डिसेंबर २०१२मध्ये हा आकडा ८७.१ दशलक्ष इतका होता, असे या संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
भारतात ऑक्टोबर, २०१२पर्यंत डोंगल्स आणि टॅब्लेट पीसीद्वारे इंटरनेटची जोडणी करून घेणाऱ्यांची व त्याच्या उपयोगकर्त्यांची संख्या ७८.७ दशलक्ष इतकी होती. मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर, २०१२पर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ती ८७.१ दशलक्षांवर गेली, असे या या संबंधातील प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. या उपयोगकर्त्यांची संख्या मार्च २०१३पर्यंत ९२.९ दशलक्षांवर, मार्च २०१४मध्ये १३०.६ दशलक्षांवर आणि मार्च २०१५पर्यंत १६४.८ दशलक्षांवर जाईल, असा अंदाज या व्यक्त करण्यात आला आहे. मार्च, २००९मध्ये ही संख्या केवळ ४.१ दशलक्ष इतकी होती.ऑक्टोबर, २०१२पर्यंतच्या ७८.७ दशलक्ष इतक्या उपयोगकर्त्यांपैकी ६१ दशलक्ष उपयोगकर्ते हे ऑफ-डेक प्रकारातील तर १५ दशलक्ष उपयोगकर्ते हे ऑन-डेक प्रकारातील होते; तर उरलेल्या २.७ दशलक्ष उपयोगकर्त्यांची गणना डोंगल्स प्रकारात मोडणारी म्हणजेच २ जी, ३ जी वा हाय स्पीड डेटा कार्डद्वारे जोडणी करून उपयोग करणाऱ्यांची होती. मोबाइल डिव्हाइसद्वारे इंटरनेटची जोडणी करून त्याचा वापर करणाऱ्या ग्राहकाला प्रतिमाह बिलापोटी सरासरी ४६० रुपये मोजावे लागतात. यापैकी इंटरनेटच्या खर्चापोटी दिली जाणारी रक्कम ही १९८ रुपये इतकी आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.मोबाइल इंटरनेटचे उपयोगकर्ते ईमेल, एसएनएस (सोशल नेटवर्किंग सव्‍‌र्हिसेस) आणि संदेशवाहक प्रणालीचा अधिक वापर करतात असे आढळून आले आहे. त्या तुलनेत व्हिडीओज्, क्रीडा प्रकार आणि बातम्यांचे वाचन याचा वापर त्यांच्याकडून आठवडय़ातून सरासरी दोन ते सहावेळा होतो, अशी माहितीही या अहवालात देण्यात आली आहे. ऑनलाइन गेम्सची जोडणी यापैकी ५० टक्के उपयोगकर्त्यांनी करून घेतली असून ३० टक्के उपयोगकर्ते ऑनलाइन न्यूज व व्हिडीओज् पाहतात, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.