सोळाव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या ४ ते ११ जून दरम्यान होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी सकाळी झाली. त्यामध्ये अधिवेशनाचा कालावधी आणि कार्यक्रम ठरविण्यात आला. कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांची या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या अधिवेशनामध्ये निवडून आलेल्या खासदारांना शपथ देण्यात येणार असून, नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना ९ जूनला संबोधित करणार असून, त्यानंतर दोन दिवस राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करण्यात येईल. ४ आणि ५ जूनला सदस्यांचा शपथविधी होईल, तर ६ जूनला नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल, असे नायडू यांनी सांगितले. लोकसभेच्या उपाध्यक्षांचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे ते म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यासाठी जुलैमध्ये पुन्हा अधिवेशन बोलावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा