कोलकाता : कूच बिहार जिल्ह्यातील मेखलीगंज भागात भारत-बांगलादेश सीमेजवळ रविवारी संशयित गुरांच्या तस्करांशी झालेल्या संघर्षांत किमान १७ पोलीस कर्मचारी जखमी झाले. या वेळी दोन पुरुष, चार महिलांना अटक करून ३४ गायींची सुटका करण्यात आली.
शनिवारी माल्दा जिल्ह्यात झालेल्या अशाच एका घटनेत सीमा सुरक्षा दलाचा ३० ते ४० संशयित तस्करांबरोबर संघर्ष झाला होता. त्यात एक बांगलादेशी नागरिक ठार झाला होता.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमेवर गायींची तस्करी होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक उचलपुकुरी गावात गेले होते. त्या वेळी एका गटाने पोलिसांवर हल्ला केला. यात जखमी झालेल्या १७ पोलिसांपैकी आठ जणांना नजीकच्या मेखलीगंज उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आले आहे. हल्ला झाल्यानंतरही पोलिसांनी तेथील निवाऱ्यातून ३४ गायींची सुटका केली.