उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्य़ात एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघाता १७ प्रवासी ठार, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये सात महिलांचा समावेश आहे.
या अपघातात पंधरा जण जागीच ठार झाले तर दोन जखमी रुग्णालयात नेत असताना मरण पावले, असे चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदकिशोर जोशी यांनी सांगितले. दरीत कोसळल्यानंतर बसचे तुकडे झाले.
ऋषिकेश येथून घाटाकडे जात असताना गाडी नंदप्रयाग घाटातील रस्त्यावरून रात्री १२.४५ वाजता ३०० फूट खोल दरीत कोसळली. पाच जखमींवर चमोली रुग्णालयात उपचार चालू असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत व राज्यपाल अझीज कुरेशी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. गढवालच्या एका कंपनीची ती बस होती, असे उत्तराखंडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader