Donald Trump Assassination Attempt : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी निकिता कॅसप या तरुणाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधील या १७ वर्षीय हायस्कूल विद्यार्थ्याने त्याच्या योजनेसाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्याच्या पालकांची हत्या केल्याचा आरोप आहे, असे एफबीआयने नुकत्याच उघड केलेल्या न्यायालयीन कागदपत्रांत म्हटले आहे.

संशयित निकिता कॅसप याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर नऊ गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत, ज्यात फर्स्ट डिग्री खूनाचे दोन गुन्हे आणि विस्कॉन्सिनमध्ये मृतदेह लपविण्यासंबंधीच्या दोन गुन्ह्यांचा समावेश आहे.

तसेच निकिता याच्यावर त्याची आई तातियाना कॅसप (३५) आणि त्याचे सावत्र वडिल डोनाल्ड मायर (५१ यांची हत्या केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, २८ फेब्रुवारी रोजी या दोघांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले होते.

फेडरल प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, तपासकर्त्यांना निकिता याची लेखी कागदपत्रे आणि टेक्स मेसेज सापडले आहेत, ज्यामध्ये त्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची हत्या करण्याचे आणि अमेरिकन सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन केले होते.

सीएनएनने दिलेल्या रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, कॅसप याने त्याच्या पालकांची कथित हत्या ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक संपत्ती मिळवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी आखलेल्या मोठ्या कटाचा भाग असू शकते.

निकिता कॅसपवर गंभीर आरोप

विस्कॉन्सिन येथे कॅसपवर जे नऊ आरोप ठेवण्यात आले आहेत ते सोडून फेडरल तपासकर्त्यांनी त्याच्यावर राष्ट्राध्यक्षांची हत्या, त्यासंबंधी कट रचणे आणि घातक शस्त्रांचा वापर करणे असे आरोप ठेवले आहेत, अशी माहिती तपास अधिकार्‍यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तसेच संशयिताच्या फोनमध्ये निओ-नाझी गट ऑर्डर ऑफ नाईन एन्जल्स या संबंधी काही गोष्टी तसेच अडॉल्फ हिटलरची स्तुती करणारी सामग्री मिलाली आहे.

संशयित निकिता कॅसपविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कॅसपचे सावत्र वडील डोनाल्ड मायर यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला होता, तर त्याची आई तातियाना कॅसपचा ११ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता, असे वृत्त बीबीसीने दिले आहे.

“राष्ट्राध्यक्षांना मारण्याच्या आणि अमेरिकेचे सरकार उलथवून टाकण्याच्या त्याच्या योजनेबद्दल तो इतरांच्या संपर्कात होता,” असे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. निकिता कॅसप याला ७ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात येईल, जिथे त्याला त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांबद्दल औपचारिकपणे माहिती दिली जाईल.