शहराच्या सवर भागातील ‘राणा प्लाझा’ ही आठ मजली व्यापारी आस्थापनांची इमारत बुधवारी कोसळून १७५ जण ठार आणि ७०० जण जखमी झाले. या इमारतीत तयार कपडय़ांचे तीन कारखाने असून हजारो कामगार त्यामध्ये काम करीत होते. इमारत कोसळल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर बचावकार्य सुरू झाले.
या इमारतीत तयार कपडय़ांच्या कारखान्यांखेरीज एका बँकेची शाखा आणि ३०० दुकाने आहेत. या कारखान्यांमध्ये सुमारे सहा हजार कामगार काम करीत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. इमारत कोसळल्यानंतर ७६ मृतदेह सापडल्याची माहिती सवर विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. तयार कपडय़ांचे कारखानदारच या दुर्घटनेस जबाबदार असल्याचा आरोप औद्योगिक पोलीस विभागाचे संचालक मोस्तफिझूर रहमान यांनी केला. सदर इमारतीस मंगळवारी काही प्रमाणात तडे गेले होते आणि त्याकडे या कारखानदारांनी दुर्लक्ष केले. मंगळवारी संध्याकाळी या इमारतीस तडे गेले; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार काही कामगारांनीही केली. या कामगारांनी तेथून सुरक्षित स्थळी जाण्याचे ठरविले होते, मात्र त्यांच्या व्यवस्थापकांनी त्यांना तेथून जाण्यास मज्जाव केला, असेही सांगण्यात आले.
या दुर्घटनेत ७०० जण जखमी झाले असून त्यांना विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हलविल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही इमारत सुरक्षा नियमांप्रमाणे बांधण्यात आली नव्हती, असा आरोप नागरिकाने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा