वृत्तसंस्था, हेरात (अफगाणिस्तान) : पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात शहरातील एका मशिदीत शुक्रवारी घडविण्यात आलेल्या स्फोटात किमान १८ जणांचा मृत्यू झाला. यात तालिबानचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या एका प्रमुख मौलवीचाही समावेश आहे, अशी माहिती तालिबानच्या अधिकाऱ्यांनी दिली. या स्फोटात २१ जण जखमी झाले आहेत.

गुझरगाह मशिदीत झालेल्या या स्फोटानंतर आवारात मृतदेह आणि जमिनीवर रक्ताचे डाग पडल्याचे एका चित्रफितीमध्ये दिसत आहे. शुक्रवारी दुपारची प्रार्थना सुरू असतानाच हा स्फोट झाला. त्या वेळी मशिदीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

स्फोटात मुजीब उल रहमान अन्सारी या प्रमुख मौलवींचा मृत्यू झाला. गेली काही दशके देशात पाश्चिमात्य मदतीने टिकलेल्या सरकारांचे ते टीकाकार होते. स्फोटाच्या आधी काही तास त्यांनी याच शहराच्या दौऱ्यावर असलेले तालिबान सरकारचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल घनी बरादर यांची भेट घेतली होती. अन्सारी यांचा स्फोटात मृत्यू ओढवल्याच्या वृत्ताला तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने दुजोरा दिला.

Story img Loader