अयोध्येतील कॅन्ट परिसरात सोमवारी दुपारी १८ हातबॉम्ब सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेवारस हातबॉम्ब मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. लष्कराच्या अधिकांऱ्यांनी हे हातबॉम्ब ताब्यात घेत नष्ट केले आहेत. हातबॉम्ब सापडलेल्या परिसरात सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे.
परिसरात खळबळ
निर्मलीकुंड येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात हे हातबॉम्ब सापडल्याचे सांगण्यात येत आहे. हा परिसर लष्कराच्या फायरिंग रेंजपासून काही अंतरावर आहे. तेथे राहणाऱ्या काही लोकांना हे बॉम्ब झुडपात आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांकडून माहिती मिळताच मिलिटरी इंटेलिजन्सचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हातबॉम्ब आपल्या ताब्यात घेतले आहेत. यामध्ये फ्यूज किंवा पिन नसल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रशासन सतर्क
फायरिंग रेंजपासून अडीच किलोमीटर अंतरावरील झुडपात हे हातबॉम्ब कसे पोहोचले? असा प्रश्न निर्माण होत आहे. निर्मलीकुंड हा निवासी भाग असून तो हाय अलर्ट परिसर आहे. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात हातबॉम्ब मिळाल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे.