कोटा : जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या १८ वर्षांच्या एका विद्यार्थिनीने सोमवारी कोटा येथे तिच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. स्वत:चे वर्णन ‘अपयशी’ असे करणारी आणि पालकांची माफी मागणारी चिठ्ठी तिने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली.
‘आई, बाबा मी जेईई करू शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे’, असे इंग्रजीतील या चिठ्ठीत लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. निहारिका सिंह ही तरुणी एक-दोन दिवसांत जेईईची चाचणी देणार होती.
हेही वाचा >>> न्यायाधीश, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्या ! गुजरात उच्च न्यायालय, सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी
‘मी अपयशी आहे. मी अतिशय वाईट मुलगी आहे. सॉरी आईबाबा. हाच अखेरचा पर्याय आहे’, असे निहारिकाच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते. एका आठवडय़ाहून कमी कालावधीत कोटय़ात झालेली ही दुसरी आत्महत्या आहे. निहारिकावर अभ्यासाचा ताण होता व ती तो हाताळू शकली नाही, असे तिच्या चिठ्ठीवरून दिसून आले. कोटा येथे विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील तणाव हा देशभरात चिंतेचा विषय ठरला आहे. स्पर्धाचा ताण येऊ देऊ नका, असा संदेश बोर्डाच्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी साधलेल्या वार्षिक संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिला, त्याच दिवशी या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.