Crime News : बिहारमधून पुन्हा एकदा एका गुन्ह्याची घटना समोर आली आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील टाऊन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १८ वर्षीय तरूणाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मगदही परिसरातील सरकारी शाळेजवळ शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. ज्यामध्ये पीडित तरुणाला दुसराच कोणीतरी असल्याचे समजून गोळ्या घालण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृताचे नाव आयुष यादव असून तो समस्तीपूर जिल्ह्यातील जितवारपूर बुल्लेचक येथील रहिवासी अशोक राय यांचा मुलगा आहे.

नेमकं कारण काय?

मृत तरुणाचे मामा विजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब आणि शेजारी यांच्यात खूप दिवसांपासून जमीनीचा वाद सुरू आहे. आयुषने त्यांचा शर्ट घातला होता आणि तो त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून बाजारात गेला होता, यावेळी जमिनीचा वाद ज्यांच्याबरोबर सुरू होता त्या शेजाऱ्यांनी आयुषला विजय समजून त्याची गोळी झाडून हत्या केली.

“मृताच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आयुष हा शिक्षणासाठी त्याच्या आजी-आजोबांच्या शहरात राहत होता. आयुष हा दुचाकी चालवत होता, तर त्याचा मित्र मागच्या सीटवर बसला होता. त्याने त्याच्या मामाचा शर्ट घातला होता, विजय राय यांचा शर्ट घातल्याने हत्या झाली. या प्रकरणात साजन कुमार आणि मुकेश कुमार या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे,” अशी माहिती शहराचे एएसपी संजय पांडे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिली माहिती

पोलिसांनी सांगितलं की, आयुष किराणा सामान आणण्यासाठी माधुरी चौकाकडे दुचाकीवरून जात होता, त्याच्या मागे दोन सशस्त्र हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यांनी केंद्रीय विद्यालयाजवळ त्याला गोळी घातली आणि पळून गेले. स्थानिकांनी तात्काळ त्याला सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याला छातीत गोळी लागली होती.

घटनेची माहिती मिळताच, टाउन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. आयुषच्या आजी-आजोबांच्या कुटुंबाचा शेजारी राहणाऱ्या साजन याच्याशी एक बिघा जमिनीवरून वाद सुरू होता. दोन्ही कुटुंबे जमिनीच्या मालकीचा दावा करत आहेत. या प्रकरणात त्यांच्यात यापूर्वीही भांडणे झाली होती. हे प्रकरण समस्तीपूर सीव्हील कोर्टात प्रलंबित आहे, असे पांडे म्हणाले.

एएसपींनी पुढे सांगितले की की, आयुष गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या आजी-आजोबांसोबत राहत होता आणि त्याचे वडील अशोक हे पेंटर आहेत. साजनच्या कुटुंबातील इतर आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी छापेमारी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.