बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात राहणारा मोहम्मद इरफान (३४) हा जिल्ह्यातील रॉबिन हूड म्हणून ओळखला जायचा. बिहारमधून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मोहम्मद इतर राज्यांमध्ये घरफोडी करण्यासाठी जात असे. नुकतीच कोची येथे एक घरफोडी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. तत्पुर्वी त्याने गुगलवर ‘कोचीमधील उच्चभ्रू वस्ती’ असा किवर्ड टाकला होता. त्यानंतर तो पानमपल्ली भागात घरफोडी करण्यासाठी आला. केवळ स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने मोहम्मदने दोन घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश मिळाले नाही. तिसऱ्या घरात तो यशस्वीपणे आत शिरला आणि रुपये एक कोटी किंमतीचे सोने व हिऱ्यांची दागिने घेऊन बाहेर पडला.
राबिन हूड चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरीच चोरी
मोहम्मद इरफान सीतामढीमध्ये रॉबिन हूड म्हणून ओळखळा जात असला तरी त्याला हे माहीत नव्हतं की, कोचीमधील ज्या घरात तो चोरी करत होता, ते घर रॉबिन हूड चित्रपट दिग्दर्शकाचे आहे. प्रसिद्ध मल्लाळम चित्रपट दिग्दर्शक जोशीय यांनी २००९ साली पृथ्वीराज सुकुमारन यांना घेऊन रॉबिन हूड हा चित्रपट तयार केला होता. हा चित्रपटही अशाच एका चोराची कथा सांगणारा होता.
कोचीमध्ये घरफोडी केल्यानंतर १५ तासांतच मोहम्मदला अटक करण्यात कोची पोलिसांना यश आले. कर्नाटकच्या उडीपीमधून स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर कोची पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी (दि. २२ एप्रिल) त्याला कोचीमध्ये आणण्यात आले. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोची पोलीस आयुक्त एस. श्यामसुंदर यांनी सांगितले की, मोहम्मदच्या गाडीचा नंबरवरून त्याचा माग काढण्यात आला. या गाडीचा नंबर महाराष्ट्राचा होता. कोचीमध्ये बसविलेल्या ऑटोमेटीक नंबर प्लेट रेकगनिशन (ANPR) सिस्टिमद्वारे त्याच्या गाडीचा नंबर पाहून त्याचा माग घेतला गेला.
स्क्रूड्रायव्हरद्वारे घरफोडी
विशेष म्हणजे घरफोडी करण्यासाठी मोहम्मद इरफान फक्त एक स्क्रूड्रायव्हर वापरत होता. लोखंडी जाळी नसलेल्य खिडक्यांमधून तो घरात शिरायचा. जोशीय यांच्या घरात शिरल्यानंतर त्यांच्या घरातील कपाटाला कुलूप लावलेले नव्हते. त्यामुळे मोहम्मदला दागिने घेऊन पसार होणे, सोपे झाले. उडीपीमध्ये जेव्हा त्याची गाडी पडकली. तेव्हा गाडीत कोणतेही शस्त्र आढळून आले नाही. कोची पोलिसांनी सांगितले की, सहा राज्यात मोहम्मदवर १९ गुन्हे दाखल झालेले आहेत. चोरीच्या प्रकरणात अनेक ठिकाणी आणि नुकतीच त्याला गोव्यात अटकही झाली होती.
सीतामढी जिल्ह्यात अनेक सामाजिक कामे
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुपरी भागातील जोगिया गावात मोहम्मदचे घर आहे. गावाच्या आसपासच्या परिसरात अनेक सामाजिक कार्यात त्याचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. गरिबांना लग्नासाठी मदत करणे, उपचाराचे पैसे भरणे अशाप्रकारची कामे तो करत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इरफानने गावातील रस्ते आणि गटारेही स्वखर्चाने दुरूस्त केली आहेत. तसेच पुपरी माणिकपूर येथून २०१६ ते २०२१ या काळात ग्रामपंचायतीची निवडणूकही जिंकली होती. पाच वर्ष त्याने सरपंच म्हणून काम पाहिले. त्यानंतर २०२१ साली त्याची पत्नी जिल्हा परिषदेला निवडून आली.
सीतामढीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोहम्मद इरफानने राज्याबाहेर घरफोड्या केल्या असल्या तरी बिहारमध्ये त्याच्यावर कोणतेही मोठे गुन्हे नाहीत. शुक्रवारी (१९ एप्रिल) कोचीमध्ये चोरी करण्यासाठी बिहारमधून ज्या वाहनात बसून इरफान आला होता, त्या वाहनावर जिल्हा पंचायत अध्यक्ष असे लिहिले होते. कोचीचे पोलीस सहआयुक्त के. एस. सुदर्शन म्हणाले की, जोशीय यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांनी शनिवारी सकाळीच पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांना घटनास्थळावरून एक अज्ञात गाडी आढळून आली होती.
त्यानंतर एनपीआरच्या मदतीने पोलिसांनी सदर गाडीचा नंबर मिळविला. पुढच्या तपासात या नंबरची गाडी केरळ-कर्नाटक सीमेवरून आत गेल्याचे आणि मंगळुरूच्या आसपास असल्याचे कळले. केरळ पोलिसांनी कर्नाटक पोलिसांना सदर माहिती पुरविल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी उडीपी येथून आरोपीला अटक केली.