* दोन दिवसांचा बंद
* नॅशनलिस्ट पार्टीचा पाठिंबा
* लष्कराला पाचारण केले
बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ साली झालेल्या युद्धादरम्यान गुन्हेगारी कारवाया केल्याच्या आरोपाखाली जमात-ए-इस्लामी या कट्टरपंथीय संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात १९ जण ठार झाले आहेत. १९७१ च्या युद्धातील गुन्हेगारी कृत्यांबाबत इस्लामीच्या नेत्यांना २१ जानेवारीपासून शिक्षा सुनावल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या आता ७५ वर पोहोचली आहे. परिस्थिती अधिक चिघळल्यामुळे सरकारने रविवारी लष्कराच्या तुकडय़ा तैनात केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय लवादाने जमात-ए-इस्लामीचा उपाध्यक्ष दिलवर हुसैन सईदी याला गुरुवारी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावल्यानंतर जमातने बांगलादेशमध्ये दोन दिवसांचा बंद पुकारला आहे. या बंदला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनेही पाठिंबा दिला आहे. बांगलादेशातील परिस्थिती तणावाची असतानाच भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी रविवारपासून तीन दिवसांच्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आले आहेत.
देशाच्या पश्चिमोत्तर भागातील बोग्रा येथे  कट्टरपंथी जमातच्या सदस्यांनी पोलिसांवर सशस्त्र हल्ला केल्यामुळे चिघळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने लष्कराला पाचारण केले आहे.
जमातने शनिवारपासून पुकारलेल्या बंदच्या काळात झालेल्या हिंसाचारात पोलीस कर्मचाऱ्यासह १९ जण मरण पावले असून ५० जण जखमी झाले आहेत.
जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबिरच्या सदस्यांनी बोग्रा, ज्योपूरत, जेनिदाह आणि राजशाही जिल्ह्य़ांत पोलिसांवर हल्ले केले. सातखिरा भागात हिंसाचार करणाऱ्या जमात शिबिरच्या सदस्यांवर बांगलादेश सीमा दलाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, विविध जिल्ह्य़ांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर लष्कराच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.  
नक्की काय झाले?
१९७१ साली झालेल्या युद्धादरम्यान गुन्हेगारी कारवाया केल्याच्या आरोपाखाली जमात-ए-इस्लामी या कट्टरपंथीय संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांना आंतरराष्ट्रीय लवादाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर हिंसाचार उस़ळला.

Story img Loader