अरुणाचल प्रदेशातील भारत आणि चीन सीमेजवळून १९ कामगार बेपत्ता असल्याची घटना घडली आहे. गेल्या १३ दिवसांपासून या कारगारांचा शोध सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमधील सुदूर कुरुंग कुमे जिल्ह्यात हे मजूर रस्ता निर्मितीचे काम होते. कुमेई नदीत बेपत्ता मजूरांपैकी एका मजुराचा मृतदेह सापडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
ईदसाठी मागितली होती सुट्टी
बेपत्ता झालेले मजूर चीनच्या सीमेजवळ रस्ता बांधण्याचे काम करत होते. या सगळ्या कामगारांनी ठेकेदाराकडे ईदनिमित्त घरी जाण्यासाठी सुट्टी मागितली होती. मात्र, सुट्टी मंजूर न झाल्यामुळे त्यांनी रसत्याचे काम अर्धवट सोडत निघून गेले होते. तेव्हापासून ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बीआरओने या सर्व मजूरांना आसाममधून कंत्राटी करारावर रस्ते बांधणीच्या कामासाठी आणले होते. ईद साजरी करण्यासाठी या सगळ्यांना पुन्हा आसामला जायचे होते. मात्र, वारंवार मागणी करुनही त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.
कामगार नदीत बुडल्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. कदाचित हे कामगार घरी जाताना नदीत बुडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्या मजूरांसोबत नेमकं काय घडलं हे स्पष्ट झाले नसून अद्याप त्यांचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.