पोलिसांच्या गोळीबारात १२ ठार
स्थानिक पंचायत निवडणुकीदरम्यान मंगळवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १९ वर पोहोचली आहे. यापैकी १२ जणांचा मृत्यू पोलीस गोळीबारात झाला आहे. गोआलपाडा जिल्ह्य़ातील परिस्थिती सध्या कमालीची तणावपूर्ण असून कृष्णाई आणि मोरनोई भागात लागू केलेली संचारबंदी बुधवारीदेखील कायम ठेवण्यात आली असून दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याबाबत गोगोई यांनी सूचना केली आहे. दरम्यान, निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारामागे विरोधी पक्षांचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री गोगोई यांनी केला आहे.
राभा हसोंग स्वतंत्र जिल्हा परिषदेच्या पंचायत निवडणुकीदरम्यान मंगळवारी संतप्त जमावाने मतदान प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारादरम्यान शंभरहून अधिक घरे जाळण्यात आली. मंगळवारी रात्री ११.३० पर्यंत हिंसाचाराच्या घटना सुरूच होत्या. या हिंसाचारादरम्यान ३० पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसह ७० जण जखमी झाले आहेत. मात्र त्यानंतर कारवाई करून पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणल्याचे मुख्यमंत्री गोगोई यांनी सांगितले.
बोडो संघटनेचा पाठिंबा असलेल्या राभा, हासोंग समाजाने स्थानिक पंचायत निवडणुकांना विरोध केला आहे. मंगळवारी पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात शस्त्रधारी गटांनी जाळपोळ करीत मतदान केंद्रांवर हल्ला चढवला. गोआलपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंगेखोरांनी केलेल्या गोळीबारात सात जण जखमी झाले असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. या वेळी हल्लेखोरांनी अनेक घरांनाही आगी लावल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी गावातून पलायन करून लष्कराच्या मदत केंद्रात आसरा घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा