भारताने पुन्हा एकदा शत्रुत्व विसरुन माणुसकीचं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. पाकिस्तानातल्या कराचीमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय आयेशा राशिद या मुलीची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Heart Transplant)यशस्वीरित्या पार पडली आहे. १९ वर्षांच्या आयेशाला २०१९ मध्ये हृदयरोग आहे हे समजलं. आयेशाच्या कुटुंबाने तिला भारतात इलाजासाठी पाठवलं. चेन्नईच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र तिला हृदयासंबंधीच्या अडचणी जाणवत होत्या. त्यानंतर चेन्नईला तिला परत आणण्यात आलं आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
आयेशाला हृदयाचा त्रास २०१९ पासून जाणवत होता
आयेशाला जेव्हा हृदयाचा त्रास आहे हे समजलं तेव्हा तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिची आर्थिक परिस्थितीही बरी नाही. चेन्नईतल्या एमजीएम हेल्थकेअर हार्ट ट्रान्सप्लांटचे प्रमुख डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी तिची मदत केली. ३१ जानेवारी २०२४ च्या दिवशी हार्ट एअर अँब्युलन्सच्या मदतीने तिला दिल्लीहून चेन्नईला आणण्यात आलं. आयेशाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आयेशाला त्यांनी आर्थिक मदतही केली. त्याचप्रमाणे तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही पार पडली आहे.
डॉ. के. आर बालकृष्णन काय म्हणाले?
डॉ. के. आर. बालकृष्णन म्हणाले की, “आयेशा पहिल्यांदा २०१९ मध्ये आली होती. त्यावेळी तिच्या हृदयाची धडधड थांबली होती. त्यावेळी तिला सीपीआर दिला होता. तसंच कृत्रीम श्वासोश्वासही देण्यात आला होता. त्यानंतर ती बरी झाली. पाकिस्तानलाही गेली. मात्र पाकिस्तानात गेल्यावर तिला आणखी त्रास होऊ लागला. पाकिस्तानात आवश्यक उपकरणं नव्हती तसंच तिची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. त्यावेळी ऐश्वर्यम ट्रस्ट तिच्यासह काही अन्य लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आणि तिच्यावर उपचार झाले.” डॉक्टरांनी सांगितलं.
डॉ. सुरेश राव काय म्हणाले?
डॉ. सुरेश राव म्हणाले हृदय ट्रान्सप्लांट करण्यासाठी हे सर्वात मोठं केंद्र आहे. दरवर्षी आम्ही १०० ट्रान्सप्लांट करतो. या मुलीला शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी तिने १० महिने वाट पाहिली. पाकिस्तानात पुरेशी साधनसामुग्री नव्हती. त्यांच्याकडे पैसेही नव्हते. त्यानंतर ऐश्वर्य ट्रस्टने मदतीसाठी निधी दिला. त्यामुळे या मुलीवर शस्त्रक्रिया करणं सोपं झालं.