फेसबुक ही सध्या अतिशय प्रसिद्ध सोशल मीडिया साईट झाली आहे. यावरुन जमलेल्या प्रेमसंबंधांमुळे एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या आईची हत्या केली आहे. ही घटना तमिळनाडू येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी या मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ५० वर्षाच्या महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एस.सुरेश या तरुणीच्या प्रियकराला आणि आणखी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. त्यांची वये १६ आणि १७ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही तरुणी थिरुवेल्लूर येथील अंजनेयपूरम येथे राहत होती. ती बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तरुणीची आई तिच्या एस.सुरेश याच्यासोबत असलेल्या नात्याला विरोध करत असल्याने तिने आईची हत्या केल्याचे सांगितले. तर सुरेश याचे वयही १९ वर्षे असून तो थंजावूर येथे राहत होता. या दोघांची मागील वर्षी फेसबुकद्वारे ओळख झाली होती. ते अद्याप प्रत्यक्षात एकमेकांना भेटलेले नव्हते, मात्र फेसबुकद्वारे त्यांचे नाते घट्ट झाले होते. सुरेश मैसूरमध्ये आयटीमध्ये काम करत असल्याचे त्याने सांगितले. तर तरुणीने आपल्या आईला आपल्या या प्रेमप्रकरणाविषयी कल्पना दिली. मात्र आईने मुलीला अशाप्रकारे फेसबुकद्वारे झालेले प्रेम विश्वासार्ह नसते असे सांगितले. यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असे आईने मुलीला वारंवार सांगितले.

इतकेच नाही तर प्रेमप्रकरणाबाबत समजल्यानंतर आईने मुलीच्या फोन वापरण्यावर निर्बंध घातले. तेव्हा या मुलीने फोनव्दारे आपल्या प्रियकराशी संपर्क ठेवत आईची हत्या करण्याचा कट रचला. तर सुरेशने शाळेत जाणाऱ्या दोन मुलांना या कामासाठी तरुणीला मदत करण्यास पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर या कटातील अनेक गोष्टी समोर आल्या. चौकशीमध्ये सुरेश आयटीमध्ये काम करत नसून तो आंध्रप्रदेशमधील एका कारखान्यात काम करत असल्याचे समजले. पण तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी सुरेशने आपण आयटीमध्ये काम करत असल्याचे सांगितले होते असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader