राजधानीतील अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या परिसरात आपल्या बाइकवरून स्टण्टबाजी करणाऱ्या युवकांच्या जमावास पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १९ वर्षांचा एक युवक ठार झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली.
सुमारे १५० युवकांचा एक गट रस्त्यांवरून रात्री दोनच्या सुमारास स्टण्टबाजी करीत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा गट हिंसक झाला. तेव्हा पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला, परंतु या युवकांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात करण पांडे याच्या पाठीला गोळी लागून त्यामध्ये करण ठार झाला. त्याचा मित्र पुनीत शर्मा हा जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुनीत शर्मा याची तपासणी केली असता त्याने अल्कोहोलचे प्राशन केल्याचे आढळले.