Pakistani Citizen In India: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर, भारत सरकारने कठोर कारवाई केली आहे. भारताने सार्कद्वारे पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी दिला आहे. यानंतर पाकिस्तान सरकारनेही भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी नागरिक पंजाबमधील अमृतसरमधील अटारी-वाघा बॉर्डर क्रॉसिंगद्वारे पाकिस्तानात परत येत आहेत. आतापर्यंत १९१ पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात गेले आहेत. तर २८७ भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. पाकिस्तानात विवाहित असूनही, भारतीय पासपोर्ट असलेल्या काही महिला म्हणत आहेत की, आवश्यक कागदपत्रे असूनही त्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अलीकडेच २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर, भारत सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आणि परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन, पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर, भारत सरकारने सिंधू पाणी करार देखील स्थगित केला आहे. याशिवाय, पाकिस्तानमधील भारतीय दूतावासाची क्षमताही कमी करण्यात आली आहे. तसेच, वाघा-अटारी सीमा देखील बंद करण्यात आली आहे.
२२९ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना
“आज, अटारी सीमेवरून १९१ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झाले आहेत. तर, २८७ भारतीय नागरिक पाकिस्तानातून परतले आहेत. काल, अटारी सीमेवरून २८ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झाले. गेल्या दोन दिवसांत अटारी सीमेवरून एकूण २२९ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत एकूण ३९२ भारतीय नागरिक पाकिस्तानातून परतले आहेत”, अशी माहिती पंजाब पोलीस प्रोटोकॉल अधिकारी अरुण महल यांनी दिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परराष्ट्र मंत्रालयाने २४ एप्रिल रोजी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, व्हिसा संबंधित हे नियम हिंदू असलेल्या आणि भारतात राहण्यासाठी दीर्घकालीन व्हिसा मिळालेल्या पाकिस्तानी नागरिकांना लागू होणार नाहीत. तसेच, जे लोक वैध कागदपत्रांसह पाकिस्तानला गेले आहेत त्यांना १ मे पूर्वी भारतात येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.