1968 Plane Crash Malkhan Singh body Found in Siachen after 56 Years : भारतीय वायूदलातील बेपत्ता असलेल्या एका जवानाचा मृतदेह ५६ वर्षांनी सापडला आहे. ५६ वर्षांपूर्वी एका विमान अपघातात ते शहीद झाले होते. मात्र या जवानाचा मृतदेह तेव्हा सापडला नव्हता. मात्र ५६ वर्षांनंतर त्या जवानाचा मृतदेह त्याच्या गावी पाठवण्यात आला. त्यामुळे संपूर्ण गावाने शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमधील शहीद मलखान सिंह यांचा मृतदेह तब्बल ५६ वर्षांनंतर सियाचिनमध्ये सापडला आहे.
मलखान सिंह हे भारतीय वायूदलातील जवान होते. १९६८ मध्ये एका विमान अपघातानंतर ते बेपत्ता झाले होते. हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंडीजवळ त्यांचं विमान कोसळलं होतं. ७ फेब्रुवारी १९६८ रोजी रोहतांक खिंडीजवळ हा विमान अपघात झाला होता. १०२ सैनिक या विमानातून प्रवास करत होते. या अपघातानंतर बेपत्ता झालेल्या चार जवानांचे मृतदेह ५६ वर्षांनंतर सापडले आहेत. हे वृत्त मलखान सिंह यांच्या गावी जाऊन धडकलं अन् गावकऱ्यांनी शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा >> “तुमच्या देशात चाललंय ते बघा”, अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अहवालावर भारताचा संताप; पक्षपाताचा आरोप करत म्हणाले…
मलखान सिंह हे सहारनपूरमधील ननौता पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फतेहपूर या गावातील रहिवासी होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९४५ रोजी झाला होता. ते बेपत्ता झाले तेव्हा अवघ्या २३ वर्षांचे होते. विमान कोसळल्यानंतर विमानातील अनेक सैनिकांचे मृतदेह सापडले. मात्र मलखान सिंह व इतर तिघांचे मृतदेह सापडले नव्हते. त्यामुळे मल्खान सिंह यांचे आई-वडील, पत्नी व इतर नातेवाईक अनेक वर्षे त्यांच्या प्रतीक्षेत होते. मात्र ५६ वर्षांत ते परतले नाहीत.
कुटुंबाने कधीच मलखान यांचा मृत्यू झाला असेल असं मान्य केलं नाही
मलखान सिंह बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची पत्नी शीलावती यांचं दुसरं लग्न लावून दिलं. मलखान सिंह यांचे धाकटे बंधू चंद्रपाल सिंह यांच्याशी शीलावती यांचं लग्न लावून देण्यात आलं. मलखान सिंह यांचा अपघात झाला तेव्हा शीलावती गर्भवती होत्या. तसेच त्यांचा पहिला मुला रामप्रसाद अवघ्या दिड वर्षांचा होता. मलखान सिंह यांच्या कुटुंबाने कधी आपल्या मुलाला मृत घोषित केलं नाही.
हे ही वाचा >> ५६ वर्षांनी सैनिकाच्या मृतदेहाचे अवशेष अंतिम संस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात, खिशातल्या ‘त्या’ कागदामुळे ओळख पटली
आई-वडील, पत्नी व मुलाचा मृत्यू, नातवाने केले अंत्यसंस्कार
आता ५६ वर्षांनंतर सियाचिनमध्ये मलखान सिंह यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे आई-वडील, पत्नी शीलावती व मुलगा रामप्रसाद यांच्यापैकी कोणीही आज जिवंत नाही. मलखान सिंह यांचा नातू गौतम याने आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. गौतम व त्याचा लहान भाऊ मनीष दोघेही आज मजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत.
हे ही वाचा >> मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?
चार जवानांचे मृतदेह सापडले
१९६८ मध्ये हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंडीजवळ भारतीय वायूदलाचं विमान एएन-१२ कोसळलं होतं. या विमानातील काही जवानांचे मृतदेह त्यावेळी सापडले. तर, काही जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, तब्बल ५६ वर्षांनंतर या विमानातील चार सैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. यापैकी एक मृतदेह कोलपुडी गावातील नारायण सिंह यांचा होता. नारायण सिंह यांच्यासह मलखान सिंह, थॉमस कॅरियन व मुन्शी या तीन जवानांचे मृतदेह देखील बर्फातून बाहेर काढण्यात आले. भारतीय लष्कराने चारही मृतदेहांची ओळख पटवल्यानंतर ते मृतदेह त्यांच्या गावी पाठवले. आज चारही मृतदेह त्यांच्या मूळ गावी दाखल झाले. त्यानंतर भारतीय लष्करातील जवानांच्या तुकड्यांनी त्यांना सलामी दिली. त्यानंतर या जवानांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.