1984 Anti Sikh Riots: शीखविरोधी दंगलीप्रकरणी ३४ वर्षानंतर काँग्रेस नेता सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या निकालामुळे मध्य प्रदेशचे भावी मुख्यमंत्री कमलनाथ हे देखील अडचणीत आले आहेत. शीख दंगलीत कमलनाथ यांचाही सहभाग होता असा आरोप करत दिल्लीत शीख समाजातील लोक सोमवारी रस्त्यावर उतरले. कमलनाथ हाय हाय, अशा घोषणाही त्यांनी दिल्या. शीखविरोधी दंगल नेमकी काय, या दंगलीत कमलनाथ यांच्यावर काय आरोप आहेत, याचा घेतलेला आढावा…
१९८४ मध्ये नेमके काय झाले ?
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकाकडूनच हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर १९८४ मध्ये देशभर शिखांच्या विरोधात भडका उडाला. १ नोव्हेंबर ८४ रोजी दिल्लीतील केट परिसरातील पालम वसाहतीमध्येही दंगल झाली. या दंगलीत सहा जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार, बलवान खोक्कर, महेंद्र यादव, गिरधारी लाल, किशन खोक्कर आणि कॅप्टन भागमल यांच्यावर आरोप होते. अहुजा समितीच्या अहवालानुसार १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत २, ७३३ शीख ठार झाले होते. या प्रकरणात ६५० खटले दाखल करण्यात आले. त्यामध्ये ३,१६३ जणांना अटक करण्यात आली होती.
कमलनाथ यांचे कनेक्शन?
शीख दंगलीच्या वेळी रकाबगंज गुरुद्वाराला जमावाने घेरले होते. जवळपास पाच तास हा प्रकार सुरु होता आणि कलमनाथ तिथे दोन तास उपस्थित होते, असा दावा केला जातो. या प्रकरणात नानावटी आयोग आणि न्या. रंगनाथ मिश्रा यांच्या आयोगासमोर वरिष्ठ पत्रकार संजय सुरी यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. सुरी त्यावेळी इंडियन एक्स्प्रेसमध्ये काम करत होते. रकाबगंज गुरुद्वाराजवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे माहिती समजल्यावर मी तिथे गेलो. कमलनाथ हे तिथे उपस्थित होते आणि ते जमावाचे नियंत्रण करत होते, असा दावा त्यांनी केला होता. एच एस फुलका यांनी ‘व्हेन अ ट्री शुक दिल्ली’ या पुस्तकातही कमलनाथ तिथे उपस्थित असल्याचा उल्लेख केला आहे. ‘गुरुद्वाराजवळ दोन शिखांना जिवंत जाळण्यात आले होते. जमाव आक्रमक होता, कमलनाथ पांढऱ्या कुर्ता- पायजम्यात तिथे उपस्थित होते’, असे त्यांनी म्हटले होते. कमलनाथ यांच्याविरोधात आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, ते देखील लवकरच तुरुंगात जातील, असा दावा फुलका यांनी केला आहे.
कमलनाथ यांचे म्हणणे काय?
कमलनाथ यांनी शीखविरोधी दंगलीत सहभागी असल्याचा आरोप फेटाळला होता. या दंगलीत माझा सहभाग नव्हता, असे कमलनाथ यांचे म्हणणे आहे. या दंगली प्रकरणी नेमलेल्या आयोगाकडूनही मला क्लीन चिट मिळाली होती, असे त्यांनी मध्य प्रदेशमधील विजयानंतर स्पष्ट केले होते.