१९८४मध्ये येथे शीखांविरोधात उसळलेल्या दंगलींप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते सज्जनकुमार आणि केंद्रीय गुप्तचर विभागास (सीबीआय) नोटिसा जारी केल्या आहेत. या दंगलींप्रकरणी सज्जनकुमार यांना मुक्त करण्यात आल्याच्या निर्णयास संबधित कुटुंबीयांच्या वतीने आव्हान देण्यात आले होते. त्या संदर्भात न्यायालयाने सज्जनकुमार आणि सीबीआयकडून उत्तर मागविले आहे.
या प्रकरणी निकाल देताना सादर करण्यात आलेल्या वैध पुराव्याचा कनिष्ठ न्यायालयाने योग्य विचार केला नाही, अशी याचिका या दंगलींमध्ये बळी पडलेल्या व्यक्तीच्या निकटवर्तीयांनी उच्च न्यायालयात केली होती. जगदीश कौर आणि नीरप्रीत कौर यांचे नातेवाईक या दंग्यात ठार झाले होते. या प्रकरणी, कनिष्ठ न्यायालयाने ३० एप्रिल रोजी दिलेला निकाल रद्दबातल ठरवावा, अशीही विनंती त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे.
उच्च न्यायालयाने या मुद्दय़ांची दखल घेऊन संबंधितांना नोटीस जारी केली.
सज्जनकुमार यांनी २ नोव्हेंबर १९८४ रोजी केलेल्या चिथावणीखोर भाषणांच्या वेळी आपण तेथे हजर होतो आणि तरीही कनिष्ठ न्यायालयाने आपल्या निवेदनांची दखल घेतली नाही, असा दावाही जगदीश कौर, जगेश कौर आणि नीरप्रीत कौर यांच्याकडून उच्च न्यायालयाकडे करण्यात आला.

Story img Loader