आज सज्जन कुमार दोषी ठरला आहे, उद्या जगदीश टायटलर दोषी ठरणार, नंतर कमलनाथ आणि मग गांधी कुटुंबाचा नंबर लागेल, असे विधान केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख दंगलीप्रकरणी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती आणि यासाठी त्यांचे आभार मानते, असेही त्यांनी सांगितले.
१९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत दिल्लीत सहा व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या दंगलीप्रकरणी सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. या निकालावर हरसिम्रन कौर बादल यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, मला आजही तो दिवस लक्षात आहे. काँग्रेस नेते पोलिसांसोबत शीख वस्तीत आले, त्यांनी घरांमध्ये घुसून अक्षरश: धुडगूस घातला. घरातील लहान मुलं रडत होती आणि त्यांच्यावर काय प्रसंग ओढावला असेल हे आठवूनही अंगावर काटा येतो. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते ‘खून का बदला खून’ असे राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर सांगत होते आणि यानंतर हजारो शिखांची हत्या करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. शिरोमणी अकाली दलाच्या विनंतीनंतर २०१५ मध्ये त्यांनी विशेष तपास पथक नेमले. दिल्ली हायकोर्टाचा निर्णय ऐतिहासिक आहे’, असे त्यांनी सांगितले.
Union Minister Harsimrat Kaur Badal: It is Sajjan Kumar today, it will be Jagdish Tytler tomorrow then Kamal Nath and eventually the Gandhi family. pic.twitter.com/6QnZgTLEEs
— ANI (@ANI) December 17, 2018
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ‘१९८४ मधील शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आजचा हा निकालही अशा वेळी आला आहे, ज्यावेळी काँग्रेस या प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीला मुख्मंत्रीपदाची शपथ देतंय’, असे त्यांनी सांगितले.