पीटीआय, भागलपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी<strong> यांनी सोमवारी पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता जारी केला. यासह देशभरातील ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये २२ हजार कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले. या वेळी पंतप्रधानांनी बिहारमध्ये अनेक प्रकल्पांची पायाभरणीदेखील केली.
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा १९ वा हप्ता हस्तांतरित केल्यानंतर भागलपूर येथील मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि बिहारच्या विकासासाठी एनडीए सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला.
या वेळी त्यांनी ‘मखाना’ (फॉक्स नट) बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच केंद्र सरकार राज्यात चार नवीन पूल बांधण्यासाठी ११०० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही संबोधित केले.
लालूंच्या टिप्पणीवरून पंतप्रधानांचा हल्लाबोल
राजदप्रमुख लालूप्रसाद यांनी महाकुंभसंदर्भात केलेल्या टिप्पणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला. हिंदू धर्माची थट्टा करणाऱ्या ‘जंगलराज’च्या नेत्यांना बिहारची जनता कधीच माफ करणार नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी लालू यांचे नाव न घेता टीका केली. काही दिवसांपूर्वीच लालू यांनी महाकुंभ अर्थहीन असल्याची टीका केली होती.
प्रयागराजमध्ये एकतेचा महाकुंभ सुरू असून आत्तापर्यंत संपूर्ण युरोपमधील एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक लोकांनी महाकुंभमध्ये स्नान केले आहे. महाकुंभासाठी बिहारमधूनही भाविक येत आहेत मात्र जंगलराजचे हे लोक महाकुंभालाच शिवीगाळ करीत असल्याची व वाईट बोलत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली.
निवडणूक व्यवस्थापनासाठी पंतप्रधान बिहारमध्ये तेजस्वी
राजद नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यावर टीका केली. या वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या व्यवस्थापनासाठी सूचना जारी करण्याच्या उद्देशाने बिहारला येत असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सूचना देण्यासाठी मोदी भागलपूरला येत असून आगामी काळात त्यांना बिहार आणि बिहारी जनतेची काळजी असेल, असा टोमणादेखील त्यांनी हाणला.