जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात रविवारी सायंकाळी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा हल्ला दहशतवाद्यांनी केल्याचे स्थानिकांचे म्हणणे असले तरी पोलीस ही बाब तपासून पाहत आहेत.

जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, हा हल्ला उर्ध्व डांगरी गावात झाला. हे ठिकाण राजौरी शहरापासून सात ते आठ किलोमीटरवर आहे.  सुमारे ५० मीटर परिघातील तीन घरांवर गोळीबार करण्यात आला. यात दोन नागरिक ठार, तर चार जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर एका जीपमधून आले होते. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून राजौरी शहरातून  सुरक्षा दलाची कुमक घटनास्थळी पोहोचली आहे.

जवानाची रायफल हिसकावून दहशतवाद्यांचा पळ 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाकडून त्याची एके रायफल दहशतवाद्यांनी हिसकावून नेली. दुपारी बारा वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  संबंधित जवान दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील राजपोरा येथे कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांनी ‘एके सव्‍‌र्हिस रायफल’ हिसकावून घेतली आणि ते पळून गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.