झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकुट टेकडीवर रविवारी रोपवेवरचे दोन डबे एकमेकांवर आदळल्याने दोन जण ठार आणि अनेक जखमी झाले आहेत. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, रोपवेमधील किमान १२ केबिनमध्ये ४८ लोक अजूनही अडकले आहेत आणि भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.


तांत्रिक बिघाडामुळे केबल कारची टक्कर झाल्यामुळे ही घटना घडल्याचे दिसते, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं, मात्र, नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेनंतर रोपवे मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली.


राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे, असे देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले.उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक सुभाष चंद्र जाट हे दोघेही घटनास्थळावरून बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. भजंत्री म्हणाले की स्थानिक ग्रामस्थ देखील एनडीआरएफला बचाव कार्यात मदत करत आहेत.


“परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. काही लोक अजूनही रोपवेमध्ये केबल कारमध्ये अडकले आहेत आणि त्यांची सुटका केली जात आहे. सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात आहे,” असं उपायुक्त भजंत्री लोकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन करताना म्हणाले. गोड्डा खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितलं की त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंग यांना माहिती दिली आणि एनडीआरएफ टीम्स तैनात करण्याची विनंती केली.