श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उत्तर प्रदेशमधील मथुरेतील ‘बांके बिहार’ मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या घटनेत २ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंदिरातील प्रसिद्ध मंगला आरतीदरम्यान ही घटना घडली.
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरात गर्दी
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मुथरेतील बांके बिहार मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरात होणारी मंगला आरती वर्षातून एकदाच केली जाते. साधारण पहाटे ३ ते ४ च्या सुमारात ही आरती केली जाते. जगभरात ही आरती प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आरतीसाठी उपस्थित होते. अचानक भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला तर ६ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत.
५० लाख भाविक मथुरेत दाखल
कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मथुरेत जाऊन श्रीकृष्णाची पूजा केली. मथुरा-वृंदावनमधील सर्व हॉटेल-लॉज आणि आश्रम गच्च भरले होते. राहण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे अनेक भाविकांनी फुटपाथवर झोपून रात्र काढली. जन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुमारे ५० लाख भाविक मथुरेत दाखल झाले होते.