Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony: अयोध्या राम मंदिराच्या उद्भाटनाला काहीच दिवस शिल्लक असताना आता कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेले तथा काँग्रेस नेते केएन राजण्णा यांचे एक विधान चर्चेत आले आहे. बंगळुरुमध्ये बोलताना, भाजप, प्रभू श्रीरामाच्या नावाने लोकांची फसवणूक करत असल्याचा दावा राजण्णा यांनी केला आहे. राजण्णा म्हणाले की, “हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास असलेली राम मंदिरे आहेत. ही पवित्र स्थळे आहेत. आता भाजप निवडणुकीसाठी मंदिरे बांधत आहे. लोकांची फसवणूक करत आहे. बाबरी मशीद पाडली तेव्हा मी तिथे गेलो होतो, भाजपने तंबूत दोन बाहुल्या ठेवल्या आणि आता त्याला प्रभू राम म्हणू लागले आहेत.”
जेव्हा आपण राम मंदिरात जातो, तेव्हा अचानकच एक वेगळीच अनुभूती येते. फरक जाणवतो. अयोध्येत मला काहीच जाणवले नाही. तिथले वातावरण टूरिंग टॉकीजमधील बाहुल्यांसारखे होते. राजण्णा यांनी आपल्या म्हणण्यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, “मंडपात ठेवलेल्या बाहुल्या होत्या म्हणून मी तुम्हा सर्वांना ते सांगितले. आता तेथे काय आहे ते मी पाहिले नाही. मी गेल्यावर, पुन्हा पाहीन आणि तेथे काय आहे ते सांगेन.”
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी या विधानावर प्रत्युत्तर देत म्हटले की, अशी विधाने काँग्रेस नेत्यांची ‘निराशा’ दाखवून देतायत. म्हणूनच त्यांनी २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.”कुणीतरी म्हटले की बाबरी मशीद जिथे उभी होती तिथे गाभारा बांधलेला नाही. अशी सर्व विधाने निराशा आणि उदासीनतेमुळे समोर आहेत. ज्या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला, त्या मधल्या घुमटाखाली असलेली खूण म्हणजे रामजन्मभूमी. रामलल्ला तिथेच गर्भगृहात विराजमान होणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या खोट्या अफवा पसरवण्याची गरज नाही.”
विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, कुमार म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या ‘अहंकारामुळे’ राम मंदिरात जाण्यास नकार दिला आहे. जसे पंतप्रधानांना निमंत्रित करण्यात आले आहे तसेच विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांनाही बोलावण्यात आले आहे. जर सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली तर तो ‘सर्वांचा’ कार्यक्रम ठरेल. त्यांच्या अहंकाराने त्यांनी आमंत्रण नाकारले असले तरी आम्हची अशी इच्छा आहे की त्यांनी आवर्जून राम मंदिरात यावे. “
हे ही वाचा << विराट अनुष्काचं ठरलं! राम मंदिराच्या उद्घाटनासाठी कोहलीची बीसीसीआयकडे खास विनंती, २१ जानेवारीलाच विरूष्का..
अयोध्या- राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु
अयोध्येतील राम लल्लाच्या मूर्तीच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याला आता फक्त पाच दिवस शिल्लक आहेत. या आठवड्यात मंगळवारी, १६ जानेवारीला वैदिक विधी सुरू होणार असून, २२ जानेवारीला भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. अभिषेक झाल्यानंतर राम लल्ला आणि सीता मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना नियुक्त केलेल्या दर्शन रांगेतून आत सोडले जाईल.