हॉवर्ड पब्लिक स्कूल शिक्षण मंडळाचा ऐतिहासिक निर्णय; मंडळाच्या शाळांमध्ये धर्म विचारला जात नाही
अमेरिकेत जिल्हापातळीवरील शाळेत दिवाळी व ईद उल तसेच चिनी नववर्षांनिमित्त मुलांना सुटी देण्याचे एकमताने ठरवण्यात आले. अमेरिकेतील हॉवर्ड काउंटी पब्लिक स्कूल शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला असून, या व्यवस्थेंतर्गत ७१ शाळा व ५० हजार विद्यार्थी येतात. या मंडळाच्या शाळांमध्ये मुलांना धर्म विचारला जात नाही. भारतीय-अमेरिकी समुदायाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा ख्रिस्तीन ओकॉनॉर यांनी सांगितले, की या निर्णयाचे आपण स्वागतच करतो. हॉवर्ड काउंटीत वेगवेगळय़ा देशाची मुले शिकतात, त्यामुळे विविधतेत एकतेचा हा आदर्श आहे. आठ सदस्यांच्या मंडळाने शाळांसाठी या सुटय़ा मान्य केल्या आहेत. विविध समुदायांतील मुलांना त्यांची संस्कृती पाळता यावी यासाठी आता संधी मिळाली आहे. जॅनेट सिद्दिकी यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यावर हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे मुरली बालाजी यांनी सांगितले, की हॉवर्ड काउंटी बोर्डाने चांगला निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या सुटीचा समावेश करावा यासाठी हिंदू अमेरिकन फाउंडेशन या संस्थेने अडीचशे सहय़ांसह निवेदन सादर केले होते, शिवाय आईवडिलांनी किमान ५०० ईमेल पाठवले होते.
हॉवर्ड काउंटी संस्थेच्या शाळातील २२ टक्के मुले कृष्णवर्णीय, ४२ टक्के श्वेतवर्णीय, १९ टक्के आशियन, ९ टक्के हिस्पॅनिक तर ६ टक्के इतर वंशाची आहेत.

Story img Loader