ऑस्ट्रेलियाने संरक्षण, तंत्रज्ञान, राजकारणी आणि विमानतळ सुरक्षा प्रोटोकॉलला लक्ष्य करणाऱ्या चार भारतीय हेरांची गुपचूप हकालपट्टी केल्याचे सार्वजनिक प्रसारण संस्था ‘एबीसी’च्या तपासात आढळून आले आहे. २०२० मध्ये भारतीय हेरांच्या कारवायांचा शोध घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारताने बाह्य मजबूत राजनैतिक आणि व्यापारी संबंधांवर जोर दिला.भारतीय हेर संवेदनशील संरक्षण तंत्रज्ञान आणि विमानतळ सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून राजकारणी तसेच पोलीस सेवा, भारतीय ऑस्ट्रेलियन नागरिकांवरही लक्ष ठेवले जात होते.
२०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचे गुप्तचर प्रमुख माईक बर्गेस यांनी भारताचे नाव न घेता ‘हेरांचे घरटे’ उघडले असल्याचे सांगितले होते. तसेच प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलियाने मुत्सद्दी म्हणून ओळखल्या गेलेल्या किमान चार भारतीय हेरांना बाहेर काढले. ‘आम्ही परदेशी हेरांचा सामना केला आणि त्यांना शांत, व्यावसायिकपणे दूर केल्याचे बर्गेस म्हणाले.