चीनच्या एका व्यापाऱ्याचे पैसै थकविल्याच्या आरोपावरून गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्येच तिष्ठत ठेवण्यात आलेल्या दोघा भारतीय व्यापाऱ्यांना राजनैतिक पातळीवर अथक प्रयत्न झाल्यानंतर मायदेशी पाठविण्यात आले. श्यामसुंदर अग्रवाल आणि दीपक रहेजा यांना दोन आठवडय़ांपूर्वी भारतात पाठविण्यात आले.
परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी रात्री दोन व्यापाऱ्यांच्या परतीची घोषणा केली. चीनचे व्यापारी केंद्र असलेल्या यीवू येथे या भारतीय व्यापाऱ्यांनी अनेकांचे पैसे थकविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
तथापि, या दोघा व्यापाऱ्यांनी या आरोपांचा इन्कार केला असून आपण केवळ येमेनी नागरिकाकडून चालविण्यात येणाऱ्या कंपनीत काम करीत होतो असे म्हटले आहे. सदर येमेनी नागरिक अनेकांचे पैसे थकवून पसार झाला, असेही या व्यापाऱ्यांनी सांगितले.
प्रथम या व्यापाऱ्यांचे स्थानिक व्यापाऱ्यांनी अपहरण केले आणि त्यानंतर भारताने हस्तक्षेप केल्यावर दोघांची सुटका करण्यात आली. त्यांना प्रवास करण्यावरही बंदी घालण्यात आली होती. मात्र कालांतराने चीनमध्ये परतण्याच्या अटीवर त्यांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आता त्यांना कायमस्वरूपी भारतात पाठविण्यात आले आहे.

Story img Loader