सौदी अरेबियाच्या नैर्ऋत्येकडील सीमेवर नजरान येथे करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन जण ठार झाले असून त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. येमेनमधून हा क्षेपणास्त्र हल्ला करण्याचे आल्याचे समजते. या वर्षांत क्षेपणास्त्र हल्ल्यात नागरिक ठार होण्याची ही तिसरी घटना आहे. काल सायंकाळी दोन भारतीय कर्मचारी व एक सौदी नागरिक या हल्ल्यात ठार झाले असल्याचे नागरी संरक्षण प्रवक्तयाने सांगितले.
प्रवक्तयाने आणखी माहिती दिली नाही. भारतीय दूतावासाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. सप्टेंबरमध्ये एक भारतीय सौदी अरेबियातील जिझान प्रांतात तोफगोळ्यांच्या माऱ्यात ठार झाला होता तर इतर तीन जण जखमी झाले होते. येमेनमधील हुथी बंडखोर हे हल्ले करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.
जिझानच्या घटनेअगोदर त्याच भागात एक भारतीय ठार तर इतर दोन जण जखमी झाले होते. सौदी अरेबियात भारतीयांचे प्रमाण जास्त असून त्यातील शेकडो लोक जिझान व नजरान भागात राहतात, सौदी आघाडीने २६ मार्चपासून हुथी बंडखोरांशी लढा चालू ठेवला असून त्यात अनेकदा सीमेवर सैनिक ठार झाले आहेत. दोन्ही देशांचे प्रतिनिधी संध्या स्वित्र्झलड येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता चर्चेत सहभागी आहेत. मार्चपासून येमेनमध्ये ५८०० लोक ठार तर २७ हजार जण जखमी झाले आहेत.