संयुक्त राष्ट्रसंघात आयोजित करण्यात आलेल्या ‘मलाला दिन’ समारंभात ‘यूएन स्पेशल एन्व्हॉय फॉर ग्लोबल एज्युकेशन्स यूथ करेज अ‍ॅवॉर्ड फॉर एज्युकेशन’ या पुरस्काराने सात युवतींना सन्मानित करण्यात आले असून त्यामध्ये दोघा भारतीय युवतींचा समावेश आहे.
मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी असामान्य धैर्य दाखविणाऱ्या जगभरातील सात युवतींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये बंगळुरूच्या अश्विनी (२१) आणि उत्तर प्रदेशच्या रझिया (१५) या भारतीय युवतींचा समावेश आहे.
तालिबान्यांनी मलालावर केलेल्या हल्ल्यात जखमी झालेली मलालाची पाकिस्तानी मैत्रीण रझिया हिलाही बांगलादेश, नेपाळ, मोरोक्को आणि सिएरा लिओन येथील युवतींसमवेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा वापर अपंगत्व असलेल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी केल्याबद्दल अश्विनीला सन्मानित करण्यात आले, तर रझिया हिला लहान मुलांच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात
आले.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांच्या ‘ग्लोबल एज्युकेशन फर्स्ट इनिशिएटिव्ह’ कार्यक्रमाला पाठिंबा म्हणून जगभरातील ५०० हून अधिक युवावर्गाला, मुख्यत्वे युवतींना निमंत्रित करण्यात आले होते.