पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्हय़ात क्रूड बॉम्ब बनविताना झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या जिल्हय़ात पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या असताना ही घटना घडली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कुमरीपारा गावात शुक्रवारी रात्री घरात बॉम्ब बनविताना झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला मुर्शिदाबादला कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सी. सुधाकर यांनी दिली. घटनेनंतर परिसरातील संशयितांची धरपकड करण्यात आली. या वेळी अनेक ‘सॉकेट बॉम्ब’ हस्तगत करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
मुर्शिदाबाद जिल्हय़ात ३४ जागांसाठी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीची निवडणूक होत आहे. बंकुरा जिल्हय़ातही १९ जागांसाठी पंचायत समितीची निवडणूक होत आहे.