फतेहगड साहीब जिल्ह्य़ातील सिरहिंद कालव्यात पंजाब परिवहन महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून अन्य ४२ प्रवासी बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.
दिल्लीहून अमृतसरला जात असताना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कालव्यात कोसळल्यानंतर बस जवळपास तीन कि.मी. अंतर वाहून गेली आणि त्यानंतर ती भाक्रा आणि नरवाना कालवा जेथे विभक्त होतो तेथे अडकली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कालव्यात कोसळण्यापूर्वी बसने संरक्षक कठडय़ाला धडक दिली. दिल्लीहून निघालेल्या या बसमध्ये किमान ४५ प्रवासी होते. कालव्यातून दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. क्रेनच्या सहाय्याने बस कालव्यातून बाहेर काढण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
अन्य प्रवाशांचे मृतदेह कालव्यात वाहून गेल्याची शक्यता गृहित धरून त्यांचा शोध घेण्यासाठी पाणबुडे आणि लष्कराचे सहकार्य घेण्यात येत आहे. बसमधील ४० ते ४५ प्रवासी बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Story img Loader