पंजाबमधल्या बठिंडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधल्या दोन अल्पवयीन मुली बठिंढा सेंट्रल जेलबाहेर सेल्फी घेत असताना पकडल्या गेल्या. दोन्ही मुली कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या चाहत्या आहेत असं त्यांनी सांगितलं. त्या दोघी बिश्नोईला भेटण्यासाठी झारखंडहून बठिंडाला आल्याचं त्यांनी सांगितलं. दोघींनाही तुरुंगाबाहेर सेल्फी काढून आपल्या मित्रांना पाठवायचा होता.
मूळच्या झारखंडच्या रहिवासी असलेल्या आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेल्या दोन्ही बहिणी गुरुवारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईला भेटण्यासाठी बठिंडा सेंट्रल जेलच्या बाहेर पोहोचल्या. दोघी जेलच्या बाहेर सेल्फी क्लिक करत होत्या. या दोघींना पाहून तुरुंगाबाहेर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलीस आणि जिल्हा बाल सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती दिली.
बठिंडा बाल सुरक्षा अधिकारी रवनीत कौर सिद्धू म्हणाले की, “दोन्ही अल्पवयीन मुली त्यांच्या पालकांशी खोटं बोलून इथे आल्या आहेत. त्यांनी पालकांना सांगितलं की त्या सहलीला जात आहेत. समुपदेशनानंतर आम्हाला समजलं की, त्या लॉरेन्स बिश्नोईमुळे प्रभावित झाल्या आहेत आणि त्या तुरुंगाबाहेर केवळ सेल्फी क्लिक करण्यासाठी आल्या होत्या.”
हे ही वाचा >> “मला माफ करा योगीजी”, एन्काऊंटरच्या भीतीने बाइकचोर हातात पोस्टर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल
दोन्ही मुलींचं सखी सेंटर येथे समुपदेशन
बठिंडाचे पोलीस उपअधीक्षक गुरप्रीत सिंह म्हणाले की, बठिंडा सेंट्रल जेलकडून एक पत्र मिळालं, ज्यामध्ये लिहिलं आहे की, दोन अल्पवयीन मुली जेल परिसरात फोटो काढत आहेत. दोन्ही मुली मूळच्या झारखंडच्या रहिवासी आहेत. त्या दोघी आता दिल्लीला जात आहेत. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आम्ही त्यांना सखी सेंटरमध्ये पाठवले आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली. त्यांचं समुपदेशन केलं जाणार आहे.