दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप उर्फ अर्श दलाच्या दोन शूटर्सना बेड्या ठोकल्या आहेत. रविवार आणि सोमवारी मध्यरात्री दिल्लीत झालेल्या चकमकीनंतर त्यांना अटक केली. दोघांच्या अटकेनंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे. संबंधित दोघांनी एका पंजाबी गायकाच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा कसून तपास पोलीस करत आहेत.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, पूर्व दिल्लीतील मयूर विहार परिसरात रविवार आणि सोमवारी रात्री दिल्ली पोलिसांचं विशेष पथक आणि दोन हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका शूटर्सच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. अथक प्रयत्नानंतर दिल्ली पोलिसांनी दोन्ही शूटर्सना बेड्या ठोकल्या. संबंधित दोघांनी एका पंजाबी गायकावर हल्ला करण्याची योजना आखली होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. एका खटल्यात पॅरोलवर सुटका झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. दोघंही कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपचे साथीदार आहेत. अर्शदीप याने २०२० मध्ये भारत सोडून कॅनडात पलायन केलं आहे. दिल्ली पोलिसांसह पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) त्याच्या मागावर आहे. पण तो सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास आहे.