जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांना मोठं यश आलं आहे. मंगळवारी सकाळी अवंतीपोरा परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांकडून दोन एके-४७ रायफलसह काही संवेदनशील साहित्य जप्त केलं आहे. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचा दोन काश्मिरींच्या हत्येत सहभाग होता. संबंधित दहशतवाद्याने एका काश्मिरी महिलेसह सरकारी कर्मचाऱ्याची हत्या केली होती.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील राजपोरा येथे सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती. शोधमोहीम सुरू असताना अचानक चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलाने चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके-४७ रायफल्स जप्त केले आहेत.

काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, मारले गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकजण एका काश्मिरी महिलेसह सरकारी कर्मचाऱ्याच्या हत्येत सामील होता. शाहिद राथेर आणि उमर युसूफ असं कंठस्नान घातलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. दोघं अनुक्रमे त्राल आणि शोपियां येथील रहिवासी होते. मृत दहशतवादी शाहिद राथेर याने अरिपाल येथील महिला शकीला आणि लुरगाम त्राल येथील सरकारी कर्मचारी जावेद अहमद यांची हत्या केली होती.

विशेष म्हणजे काल पुलवामा जिल्ह्यातील गंडीपोरा परिसरात भारतीय सुरक्षा दलांनी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. रविवारी रात्री पुलवामा जिल्ह्यातील गुंडीपोरा परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी परिसराला घेराव घातला होता. शोध मोहीम सुरू असताना अचानक चकमक सुरू झाली. त्यानंतर रात्रभर चकमक सुरू होती. सोमवारी सकाळी सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.

Story img Loader