श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले अशी माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिली. पुलवामामधील निहामा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे घेराबंदी करून शोधमोहीम राबवली असे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही के बिरधी यांनी सांगितले. मृत दहशतवाद्यांची ओळख आणि ते कोणत्या गटासाठी कार्यरत होते याचा तपास लावला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा >>> जम्मूमध्ये मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात

पोलिसांनी दहशतवाद्यांबद्दल अधिक काही सांगितले नसले तरी, लष्कर-ए-तय्यबाचे (एलईटी) दोन दशतवादी सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाबरोबर चकमक करत असल्याची माहिती सूत्रांनी आधी दिली होती. यापैकी एक दहशतवादी दीर्घकाळापासून सुरक्षा दलाच्या रडारवर होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ अहमद दार आणि रईस अहमद अशी त्यांची नावे असून दोघेही पुलवामाच्या काकापोरा गावचे रहिवासी आहेत. यापैकी दार सप्टेंबर २०१५पासून एलईटीबरोबर कार्यरत असून अनेक वेळा सुरक्षा दलांच्या तावडीतून निसटला आहे. तर अहमद २०२१पासून एलईटीबरोबर आहे.

‘एक्स’वरून पोलिसांनी माहिती दिली की, दहशतवादविरोधी मोहिमेत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यांचा परिचय आणि दहशतवादी गट यांची खात्री केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 terrorists killed in pulwama encounter zws